थाळी,गोळा,भालाफेक- इ.सर्व

व्यायामी व मैदानी खेळ


 1. व्यायामी व मैदानी खेळ
 2. धावण्याच्या शर्यती
 3. अडथळ्यांच्या शर्यती
 4. शिखरलक्ष्यी शर्यत
 5. क्षेत्रपार शर्यत
 6. मॅराथॉन शर्यत
 7. उड्या मारण्याच्या शर्यती : उंच उडी
 8. बांबू-उडी
 9. लांब उडी
 10. तिहेरी उडी
 11. फेकीच्या शर्यती : गोळाफेक
 12. हातोडा फेक
 13. थाळीफेक
 14. भालाफेक
 15. चालण्याच्या शर्यती
 16. क्रीडागट-शर्यती
 17. स्त्रियांचे व्यायामी व मैदानी खेळ
 18. काही जागतिक विक्रम व खेळाडू
 19. धावणे


व्यायामी व मैदानी खेळ

(अ‍ॅथ्‌लेटिक्स). धावणे, चालणे, उड्यांचे प्रकार,फेकीचे प्रकार, अडथळ्यांच्या शर्यती इ. वैयक्तिक बळाने (काही अपवाद वगवाद वगळता) व तंत्राने खेळल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा समावेश सामान्यतः व्यायामी व मैदानी खेळांमध्ये होतो. हे जगातील प्राचीनतम व लोकप्रिय क्रीडाप्रकार होत.
‘ट्रॅक अँड फील्ड स्पोर्ट्‌स’ या नावानेही हे खेळ ओळखले जातात. अमेरिकेमध्ये ‘ट्रॅक’ व अन्य इंग्लिश भाषक देशांत ‘अ‍ॅथ्‌लेटिक्स’ या संज्ञा सामान्यतः  ‘ट्रॅक’ (धावमार्गावरील) प्रकारात धावण्याच्या, वेगाने चालण्याच्या विविध अंतरांच्या स्पर्धा, अडथळ्यांच्या शर्यती (हर्डल्स), रस्त्यावरील धावशर्यती, क्षेत्रपार (क्रॉसकंट्री) शर्यती, शिखरलक्ष्यी शर्यती (स्टीपलचेस), सांघिक शर्यती (रिले) इत्यादींचा समावेश होतो.
‘फील्ड’ (मैदानी) प्रकारांत उड्यांचे वेगवेगळे प्रकार (उदा. लांब, उंच, तिहेरी, बांबू-उडी), फेकींचे प्रकार (उदा. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक), क्रीडागटशर्यती (दशशर्यती गट, सप्तशर्यती गट, पंचशर्यती गट) इत्यादींचा अंतर्भाव होतो. या स्पर्धा अंतर्गेही व बहिर्गेही या दोन्ही प्रकारे घेतल्या जातात.
स्त्री व पुरुष खेळाडूंच्या स्पर्धा वेगवेगळ्या घेतल्या जातात.
हे क्रीडाप्रकार मूलभूत मानवी शरीरक्रिया व हालचाली यांतून अगदी सहजपणे प्राचीन काळात उगम पावले असावेत. शिकार करणे वा हिंस्र श्वापदांपासून स्वत:चा बचाव करणे या हेतूंनी वेगाने धावणे, उड्या मारून वाटेतले अडथळे पार करणे, पाण्यातून पोहून पलीकडे जाणे, अणकुचीदार दगड वा भाले तयार करून ते अचूक नेम धरून लक्ष्यावर फेकणे, अशा प्रकारच्या क्रिया व हालचाली करणे आदिमानवाला क्रमप्राप्तच होते. या हालचालींनाच कालांतराने निखळ क्रीडात्मक स्वरूप प्राप्त होउन त्यांतून निरनिराळे व्यायामी व मैदानी क्रीडाप्रकार विकसित होत गेले असावेत, असे दिसते. पुढे मनुष्यस्वभावातील स्पर्धावृत्तीच्या प्रभावाने शर्यतींचा उगम झाला असावा. प्राचीन ग्रीसमध्ये ऑलिंपिक क्रीडासामन्यांना इ. स. पू. सु. ७७६ मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धा दर चार वर्षांनी भरवल्या जात असत. इ. स. ३९३ मध्ये त्या बंद पडल्या. ग्रीक स्त्रियांच्याही वेगळ्या क्रीडास्पर्धा (Heraea) दर चार वर्षांनी भरवल्या जात. इंग्लंडमध्ये इ. स. सु. ११५४ मध्ये मैदानी क्रीडास्पर्धांना प्रारंभ झाला; पण त्यांना खरी लोकप्रियता लाभली, ती एकोणिसाव्या शतकात. रस्त्यावर घोडागाडीपुढे पादचाऱ्यांनी पायी धावण्याच्या शर्यती (पिडेस्ट्रिऍनिझम) अठराव्या शतकात लोकप्रिय होत्या.
इंग्लंमध्ये १८२५ च्या सुमारास हौशी खेळाडूंच्या स्पर्धा भरवल्या जात, त्यांतून आधुनिक मैदानी क्रीडास्पर्धांचा उदय झाला. पहिली आंतरविद्यापीठीय क्रीडास्पर्धा १८६४ मध्ये ऑक्सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांत; तर पहिली आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा १८९५ मध्ये ‘न्यूयॉर्क अ‍ॅथलेटिक क्लब’ व ‘लंडन थलेटिक क्लब’ यांच्यात झाली. अर्वाचीन ऑलिंपिक क्रीडासामने ग्रीस देशातील अथेन्स येथे १८९६ मध्ये प्रथम भरवले गेले, त्यांत धावमार्ग-स्पर्धांमध्ये दहा देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय मैदानी क्रीडासामान्यांचे नियमन व नियंत्रण करणारी ‘इंटरनॅशनल अमॅच्यूअर अ‍ॅथलेटिक फेडरेशन’ (आय्. ए. ए. एफ्.) ही संघटना १९१२ मध्ये सोळा देशांनी मिळून स्थापन केली. सध्या १८० देश तिचे सदस्य आहेत. ही संघटना स्त्री व पुरुष खेळाडूंच्या एकूण ६५ अ‍ॅथलेटिक क्रीडाप्रकारांतील विश्वविक्रमांची नोंद ठेवते.
हे विश्वविक्रम सामान्यत: मेट्रिक परिमाणातील अंतर विचारात घेऊन नोंदवले जातात. मैदानी क्रीडास्पर्धांसाठी असलेल्या क्रीडांगणाची एकंदर लांबी सु. १७८·६१ मी. (५८६’-१’’) असते. क्रीडांगणाच्या समोरच्या दोन बाजू समांतर असतात व उरलेल्या दोन बाजू अर्धगोलाकार पद्धतीने या सरळ रेषांना जोडतात. क्रीडांगणाच्या आतील सरळ बाजूंची लांबी सु. १६३·९८ बाहेरच्या सीमारेषेपर्यंतचे अंतर ७·३१ मी (२४’) असते. क्रीडांगणाची रुंदी ७८·०२ मी. (२५६’-१’’) असून आतील सरळ बाजूतील अंतर ६३·३९ मी. (२०८’-१’’) असते.

धावण्याच्या शर्यती

यात लघू, मध्यम व दीर्घ पल्ल्यांच्या शर्यतींचा अंतर्भाव होतो. ही अंतरे क्रमश: लघू १०० ते ४०० मी.; मध्यम ४०० ते १०,००० मी. व दीर्घ १०,००० मी. ते मॅराथॉन शर्यत - ४२,१९५ मी. (२६ मैल ३८५ यार्ड) अशी असतात.
धावमार्गाच्या आतील मार्ग हा धावण्याच्या प्रत्यक्ष अंतरापेक्षा सु. किमान ३० सेंमी. (१’) आतील बाजूस आखतात. धावत असताना स्पर्धकाच्या शरीराची डावी बाजू धावमार्गामध्ये आतील बाजूस असावी लागते.
शर्यतीचा शेवट जेथे होतो, तेथे दोन खांबांच्या मध्ये एक अंतिम रेषा आखलेली असते. त्या रेषेपलीकडे गेल्याशिवाय खेळाडूने ती रेषा ओलांडली, असे होत नाही. निकाल सुलभ व्हावा, म्हणून अंतिम रेषेवरील दोन्ही खांबांच्या दरम्यान सु. १·२२ मी. (४’-१’’) उंचीवर जाड लोकरीचा धागा बांधलेला असतो.

अडथळ्यांच्या शर्यती

सामान्यत: पुरुषांसाठी अडथळ्यांची शर्यत ११० मी. व ४०० मी. अंतराची ठेवण्यात येते. महिलांसाठी अडथळ्यांची शर्यत १०० मी. आणि ४०० मी. अंतराची ठेवण्यात येते. प्रत्येक धावमार्गावर अडथळ्यांच्या पट्ट्यांच्या (हर्डल्स) दहा रांगा असतात. त्यांची उंची व परस्परांतील अंतर हे शर्यतीच्या अंतरावर अवलंबून असते. प्रत्येक अडथळा आयताकृती असून त्याची वरील आडवी पट्टी लाकडाची असते. अडथळ्यांच्या पट्ट्या धक्का लागून पडल्या, तरी स्पर्धक बाद होत नाही. मात्र त्याची गुणसंख्या कमी होते. स्पर्धकाला प्रत्येक अडथळापट्टीवरून उडी मारावीच लागते. उडी मारताना आणि पट्टी ओलांडताना दोन्ही पाय (एका वेळी नव्हे) पट्टीवरूनच पलीकडे न्यावे लागतात. अडथळापट्टीच्या बाजूने पाय नेल्यास स्पर्धक बाद होतो.
कोष्टक
स्पर्धेचे अंतर
प्रत्येकअडथळ्याचीउंची
प्रारंभरेषेपासून पहिल्याअडथळ्याचे अंतर
दोनअडथळ्यांमधीलअंतर
शेवटच्या अडथळ्यापासूनचेअंतिम रेषेचे अंतर
पुरुष- ११० मी.
१·०७० मी.
१३·७२ मी.
९·१४ मी.
१४·०२ मी.
पुरुष-४०० मी.
०·९१४ मी.
४५·०० मी.
३५·०० मी.
४०·०० मी.
महिला-१००मी.
०·८४० मी.
१३·०० मी.
८·५० मी.
१०·५० मी.
महिला-४००मी.
०·७६२ मी.
४५·०० मी.
३५·०० मी.
४०·०० मी.
अडथळा शर्यतीत भारतीय महिला धावपटू, पी. टी. उषा.प्प्यांच्या सांघिक शर्यती : (रिले). या शर्यतीत प्रत्येकी चार स्पर्धकांचा एक संघ असे स्पर्धक-संघ भाग घेतात. एका स्पर्धकाने विशिष्ट अंतर पार केल्यावर आपल्या हातातील दांडू (बॅटन) दुसऱ्यासहस्पर्धकाच्या हाती द्यावयाचा असतो. उदा. ४ X १०० मी. टप्प्यांच्या शर्यतीत शंभर मी. अंतरावर एक असे स्पर्धक असावे लागतात. स्पर्धेच्या अंतिम रेषेपर्यंत हाच क्रम राहतो. मात्र ज्या रेषेअलीकडे स्पर्धक उभा असतो, त्या रेषेअलीकडेच हा दांडू बदलावा लागतो. जर रेषा ओलांडली, तर संघ बाद होतो.

शिखरलक्ष्यी शर्यत

(स्टीपलचेस). या शर्यतीत स्पर्धकाला बरेच अडथळे ओलांडून पुढे जावे लागते. उदा.३,००० मी. च्या ऑलिंपिक स्टीपलचेस स्पर्धेत धावपटूला एकूण ३५ अडथळे ओलांडावे लागतात. त्यांत २८ हर्डल्स व ७ पाण्यातील उड्या असतात. यात अडथळे (हर्डल्स) तर असतातच; पण धावमार्गात ३·६६ मी. (१२’ X १२’) एवढ्या पाण्याच्या खाड्यातून उडी मारून (वॉटर जंप) स्पर्धकाला जावेच लागते. हेच या शर्यतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

क्षेत्रपार शर्यत

(क्रॉसकंट्री रेस). या शर्यतीचा प्रारंभ आणि शेवट स्पर्धेच्या मैदानात होतो. यामधील अंतर हे अडचणीच्या आणि असमान मैदानातून गेलेले असते. स्पर्धेचा धावमार्ग रहदारी नसलेल्या खुल्या जागेतून, शेतांमधून, बखळींतून, ओसाड व गवताळ जागेतून, काही भाग नांगरलेल्या उंचसखल जमिनीवरून, झाडीझुडपांतून जाणारा असावा. मात्र हे अडथळे, वाटेतले खड्डे, चढउतार हे स्पर्धकाला अडचणीत टाकणारे वा धोकादायक असू नयेत. नियोजित मार्ग स्पर्धकाला स्पष्ट कळावा, म्हणून वाटेत निशाणे वा मार्गदर्शक खुणा असलेले फलक लावलेले असतात.

मॅराथॉन शर्यत

या शर्यतीची सुरुवात आणि शेवट फक्त मैदानात होतो. स्पर्धकाला दरम्यानचे अंतर पक्क्या रस्त्यावरून वा पदपथावरून धावावे लागते. या शर्यतीचे प्रारंभरेषेपासून अंतिम रेषेपर्यंतचे अंतर ४२ किमी. १९५ मी. (२६ मैल ३८५ यार्ड) इतके दीर्घ असल्यामुळे, हे अंतर स्पर्धक धावू शकेल, याबाबतचा वैद्यकीय दाखला स्पर्धकाने देणे आवश्यक असते. 

उड्या मारण्याच्या शर्यती : उंच उडी

यांत दोन बाजूंना दोन उभे खांब (अपराइट्स) असून, त्यांतील अंतर ३·६६ ते ४ मी. (१२’ ते १३’-२ १/४’’) असते. या आधारभूत खांबांवर आडवी दांडी (क्रॉसबार) बसवलेली असते. दोन्ही बाजूंच्या आधारभूत खांबांना प्रत्येकी अर्ध्या इंचावर आरपार भोके असून, त्यांत खिट्ट्या घालून त्यांवर आडवी दांडी ठेवली जाते आणि त्यावरून पलीकडे स्पर्धक उडी मारतात. स्पर्धेच्या प्रारंभी आडवी दांडी टप्प्याटप्प्याने वरवर सरकवली जाते. याबाबत घोषणा करून स्पर्धकांना कल्पना दिली जाते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सामान्यत: १·६० ते १·६७ मी. (५‘-३’’ ते ५’-६’’) एवढ्या उंचीपासून उडीला प्रारंभ करतात. स्पर्धकाला तीन संधी मिळतात. उडी मारताना स्पर्धकाचा दांडीला स्पर्श झाला तरी चालतो.
उंच उडी मारण्याच्या तीन पद्धती रूढ आहेत : (१) स्ट्रॅडल, (२) वेस्टर्न रोल व (३) सीझर्स. ‘स्ट्रॅडल’ पद्धतीने उडी मारताना प्रथम उजवा पाय पलीकडे जाणे आवश्यक असते. त्याच वेळी तोंडाची व शरीराची दिशा जमिनीकडे करून शेवटी डावा पाय दांडीपलीकडे न्यायचा असतो. या पद्धतीत शरीर दांडीला समांतर आडव्या स्थितीत पलीकडे नेले जाते. ही पद्धती जास्त प्रचलित आहे.
‘वेस्टर्न रोल’ पद्धतीने उडी मारताना सगळे शरीर डाव्या पायावर उसळी घेऊन, हवेत एकदम उचलून, आडव्या दांडीवर किंचित तिरके करून व दोन्ही पाय छातीजवळ घेऊन पलीकडे जाणे आवश्यक असते. अमेरिकेच्या जॉर्ज होराईन याने ही पद्धती शोधून काढली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत ती प्रमाणितही धरली जाते.
‘सीझर्स’ म्हणजे कात्री पद्धतीच्या उडीत प्रथम उजवा किंवा डावा पाय व त्यानंतर मागील पाय आडव दांडीवरून पलीकडे न्यायचा असतो. मात्र स्ट्रॅडलप्रमाणे यात तोंड वा पोट जमिनीच्या दिशेला करावे लागत नाही.
या तीन पद्धतींशिवाय अमेरिकेच्या रिचर्ड फॉसबरीने (१९४७-) एक नवीनच पद्धती मेक्सिको ऑलिंपिकमध्ये (१९६८) शोधून काढली, ती ‘फॉसबरी’ शैली म्हणून ओळखली जाते. त्यात हवेत उडी मारल्यावर स्पर्धक १८० अंशाने वळतो आणि आडव्या दांडीवरून पालथा होऊन प्रथम डोके वरच्या बाजूस व नंतर पाय आडव्या दांडीपलीकडे नेऊन पाठीवर फोमरबर मॅटवर पडतो. या पद्धतीने उडी मारून फॉसबरीने ऑलिंपिक स्पर्धांतील जागतिक उच्चांक (७’ ४ १/२’’ = २·२४ मी.) नोंदवला. हे आधुनिक तंत्र ‘फॉसबरी फ्लॉप’ म्हणून ओळखले जाते आणि अलीकडच्या काळात जागतिक दर्जाच्या खेळाडूंमध्ये जास्त लोकप्रिय ठरले आहे.

बांबू-उडी

(पोल व्हॉल्ट). या उडीत बांबूच्या आधाराने खेळाडूला अधिकाधिक उंच उडी मारावयाची असते. बांबू रोवण्यासाठी जी पेटी (व्हॉल्टिंग बॉक्स) बनवलेली असते, ती १ मी. (३’-४’’) लांब, पुढील बाजूस ६० सेंमी. (२’) रुंद व जिथे बांबू रोवला जातो त्या बाजूकडे १५ सेंमी. (६’’) रुंद असते. ह्या ठिकाणाची खोली २० सेंमी. (८’’) असते. या पेटीचा तळ ८० सेंमी. (२’-८’’) लांबीपर्यंत लोखंडी पत्र्याने मढवलेला असतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत या उडीची सुरुवात सु. ३.०४ मीटर पासून (सु.१०’) होते. या उडीत पुढील तीन प्रमुख क्रिया असतात : (अ) दांडीच्या दिशेने एका लयीत धावत येणे, (आ) आडव्या दांडीच्या (क्रॉसबार) वर उंच व योग्य दिशेने उडी मारणे आणि (इ) दांडीच्या वर गेल्यावर बांबू हातातून सोडणे. बांबू हा कळक, ऍल्युमिनियम, प्लॅस्टिक, तंतुकाच यांपैकी कोणत्याही माध्यमातील चालू शकतो. तंतुकाचेचा बांबू वजनाला हलका व जास्त लवचीक असल्याने जागतिक खेळाडू त्या प्राधान्य देतात.

लांब उडी

सुमारे २० मी. अंतरावरून धावत येऊन फळीवर एक पाय रोवून हौद्यात लांबवर दोन्ही पायांनी उडी मारणे, म्हणजे लांब उडी होय. ही लाकडाची फळी १·२१ मी. (४’) लांब व २० सेंमी. (८’) रुंद असते, तिला उड्डाण फळी (टेकऑफ बोर्ड) म्हणतात. स्पर्धकाचा पाय वा पायाचा काही भाग या फळीपलीकडे गेल्यास ती उडी बाद ठरवतात. स्पर्धकाने उडी मारल्यानंतर शरीराच्या सर्वांत मागच्या भागाचा हौद्यातील जमिनीस वा गादीस स्पर्श होईल, त्या ठिकाणापासून फळीपर्यंतचे अंतर मोजले जाते. लांब उडी मारण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत : (१) नी टेक्, (२) हिच किक्.
‘नी टेक्’ मध्ये फळीवरून उडी घेतल्यावर गुडघे छातीजवळ आणले जातात आणि उडी घेतल्यावर विरुद्ध बाजूचा हात व पाय उंच व समोर धरला जातो. ‘हिच किक्’ पद्धती आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वमान्य झाली आहे. या उडीत स्पर्धक हवेत गेल्यावर धावगती तशीच पुढे चालू ठेवतो. या उडीत धावत येणे (ऍप्रोच रन), फळीवर पाय टेकून उडी घेणे (टेकऑफ), हवेतील उड्डाण (फ्लाइट) आणि जमिनीवर येणे (लँडिंग) असे चार ठळक टप्पे असतात.

तिहेरी उडी

(ट्रिपल जंप). या उडी प्रकारात धावत येणे, फळीवरून लंगड घेणे (हॉप), झाप टाकणे (स्टेप) व लांब उडी मारणे (जंप) या क्रमाने केल्या जाणाऱ्याआ क्रियांचा समावेश होतो, म्हणून त्यास ‘लंगडझाप उडी’ (हॉप-स्टेप-जंप) म्हणतात. उड्यांच्या प्रकारात ही अतिशय अवघड उडी आहे. या उडीत खेळाडू ज्या पायावर उडी घेतो, तोच पाय प्रथम जमिनीवर टेकवतो. त्यानंतर दुसऱ्या पायावरची उडी व शेवटी दोन्ही पायांनी जास्तीत जास्त दूरवर लांब उडी मारतो. तिहेरी उडीत हे तीन टप्पे खेळाडूस सलगपणे पार करावे लागतात.

फेकीच्या शर्यती : गोळाफेक

(शॉट पुट). ऑलिंपिक सामन्यात पुरुष खेळाडूंसाठी ७·२५७ किग्रॅ. (१६ पौंड), तर स्त्री खेळाडूंसाठी ४ किग्रॅ. (८ पौंड १३ औंस) एवढा गोळा वापरला जातो. शालेय स्पर्धांमध्ये मुलांसाठी ५.४४३ किग्रॅ. (१२ पौंड) गोळा वापरला जातो. स्पर्धेसाठी वापरला जाणारा गोळा लोखंडी वा पितळी असून, त्यात शिशासारखा वजनदार धातू भरलेला असतो. २·१३ मी. (७’) व्यासाच्या वर्तुळातून गोळ्याची फेक करायची असते. गोळा फेकण्याच्या बाजूस एक बाकदार फळी असते, तिची लांबी १·२१ मी. (४’), रुंदी ११ सेंमी. (४ १/२’’) व उंची १० सेंमी. (४″) असते. वर्तुळातून केलेल्या फेकी वाटेल त्या बाजूस न जाता समोरच्या मर्यादित क्षेत्रातच पडाव्या लागतात. गोळ्याची पकड, पायांची विशिष्ट हालचाल व गोळाफेक आणि पायांची अदलाबदल असे तीन टप्पे गोळाफेकीत असतात. पायांच्या हालचालींतही दोन प्रकार आहेत : घसरण्याची (ग्लायडिंग) क्रिया व लंगडण्याची (हॉपिंग) क्रिया.

हातोडा फेक

(हॅमर-थ्रो). यातील गोळा शिशाचा अथवा पितळी असून शिसे व ओतीव लोखंडाने भरलेला असतो. त्याची मूठ पोलादी तारेची असून तार ३ मिमी. (१’’ १०) व्यासाची असते. मुठीची पकड व गोळा यांतील लांबी सर्वसामान्यपणे १.२१ मी. (४’) असते. साखळी-मुठीसहित गोळ्याचे वजन कमीत कमी ७.२५७ किग्रॅ. (१६ पौंड) असावे, असा नियम आहे. शालेय स्पर्धांमध्ये मुलांनी वापरावयाच्या उपकरणाचे वजन कमीत कमी १२ पौंड असावे लागते. या गोळ्याची फेक सुरक्षित असावी, म्हणून ८·२२ मी. (२७’) व्यासाचा एक सुरक्षा पिंजरा असतो. तो तीन बाजूंनी बंद असून फक्त फेकीच्या दिशेने उघडा असतो. खुली बाजू ७ मी. (२३’) असते. पिंजरा २ १/४’’  ४ १/२’’ अशा तारेच्या जाळीच्या पडद्याप्रमाणे असतो. उभे राहणे (पवित्रा), गोळा फिरवणे, गिरक्या घेणे व गोळा फेकणे हे हातोडाफेकीतील कृतींचे चार टप्पे आहेत.

थाळीफेक

(डिस्क-थ्रो). थाळीच्या कडेचा भाग धातूचा असून मध्यभाग लाकडी असतो. थाळीचा व्यास २१ सेंमी. (८ ५/८’’) असून मध्यभागी जाडी ४·४ सेंमी (१ ३/४’’) असते. टोकाची जाडी १·२ सेंमी. (१/२’’) असते. थाळीचे वजन पुरुषांकरिता २ किग्रॅ., तर स्त्रियांकरिता असलेल्या थाळीचे वजन १ किग्रॅ. एवढे असते. ज्या वर्तुळातून थाळी फेकली जाते, त्याचा व्यास २·५ मी. (८’-२’’) असतो. थाळीफेकीत थाळीची पकड, वळणे (पिव्हट) आणि फेकण (हर्लिंग) या क्रिया महत्त्वाच्या असतात. युरोपमध्ये प्रचलित असलेल्या थाळीफेक पद्धतीत वळण्याची क्रिया वेगाने होते, तर अमेरिकन थाळीफेक तंत्रात शरीराच्या हालचाली जास्त नैसर्गिक व तालबद्ध होतात.

भालाफेक

(जॅव्ह्‌लिन-थ्रो). भाला तीन भागांचा बनवलेला असतो. भाल्याचा फाळ वा टोक, भाल्याची दांडी आणि भाल्याची मूठ. भाल्याची दांडी लाकडी बांबूची वा धातूपासून बनवलेली असते. दांडी हातात पकडण्यासाठी दांडीच्या मध्यावर दोरी गुंडाळून पकड वा मूठ तयार केलेली असते. भाल्याचे टोक धातूचे व निमुळते बनवलेले असते. हे धातूचे टोक २५ ते ३३ सेंमी., दोरीची मूठ १५ ते १६ सेंमी. व भाल्याची एकूण लांबी २·६० ते २·७० मी. असते.
भाल्याची दांडी मध्यभागी जाड व तेथून दोन्ही टोकांकडे निमुळती होत जाते. भालाफेक करण्यासाठी धावमार्ग किमान ३० मी. ते कमाल ३६·५ मी. लांबीचा असावा. ४ मी. अंतरावर २ समांतर रेषा (५ सेंमी. जाडीच्या) आखाव्यात. नंतर ८ मी. (२६’-३’’) त्रिज्या घेऊन दोन समांतर टोकांना पोचेल, असा कंस आखावा. ही कड धातूची वा लाकडाची करावी आणि तिची जाडी ७ सेंमी. ठेवून ती पांढर्यात रंगाने रंगवून जमिनीच्या पातळीत पक्की करावी.
ही ‘स्क्रॅच लाइन’ असून, तिच्यामागून भालाफेक करावी, असा नियम आहे. ही रेषा ओलांडली, तर फेक बाद ठरते. भाला पकडण्याच्या दोन पद्धती आहेत : (१) अमेरिकन पकड व (२) फिनिश पकड. अमेरिकन पकडीत अंगठा व तर्जनी यांच्या विळख्यात भाला धरला जातो. फिनिश पकडीत मध्यभागी तोल रहावा, म्हणून दोरीने गुंडाळलेल्या जागेचा खालचा भाग हा अंगठा व मधले बोट यांनी मजबूत पकडून, तिरकस तळव्याच्या पोकळीत भाला धरला जातो. तर्जनी ताठ असून दोरीवर असते. भाल्याची पकड, धावत येणे व फेकणे व त्याचबरोबर पायांची अदलाबदल करणे, हे भालाफेकीतील कृतींचे प्रमुख टप्पे आहेत.

चालण्याच्या शर्यती

या शर्यतीतील चालण्याच्या क्रियेत जास्त चापल्य व कौशल्य असावे लागते. स्पर्धकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. त्यासाठी खाच पंच नेमले जातात. जमिनीचा स्पर्श न तुटता, सतत व एकापाठोपाठ पावले टाकीत पुढे चालत जाणे, म्हणजे ‘चालणे’ होय. मागील पायाचा जमिनीशी स्पर्श तुटण्यापूवी पुढील पायाचा जमिनीशी स्पर्श झाला पाहिजे.
तसेच जमिनीला स्पर्श करणाऱ्या पायाचा गुडघा एक क्षणभर तरी सरळ केला गेला पाहिजे. ऑलिंपिक सामन्यांत २० किमी. (१२ मैल ७५२ यार्ड) चालणे ह्या प्रकाराचा समावेश केलेला आहे. दीर्घ पल्ल्याच्या चालण्याच्या शर्यतीत (२० किमी. पेक्षा जास्त अंतराच्या) खेळाडूंना विशिष्ट अंतरावर खाद्यपदार्थ व पेय देण्याची व्यवस्था केली जाते. तसेच ठरावीक टप्प्यावर खेळाडूला हुशारी आणण्यासाठी अंगावर पाणी मारण्याची (स्पंजिंग पॉइंट्स) सोय केली जाते.

क्रीडागट-शर्यती

या प्रकारांत दशशर्यती गट (डिकॅथलॉन), पंचशर्यती गट (पेंटॅथलॉन) व सप्तशर्यती गट (हेप्टॅथलॉन) या स्पर्धांचा समावेश होतो. पुरुषांच्या दशशर्यती गटस्पर्धांमध्ये एकूण १० क्रीडाप्रकार दोन दिवसांमध्ये पार पाडावे लागतात आणि खेळाडूला प्रत्येक प्रकारात भाग घ्यावाच लागतो. पहिल्या दिवशी १०० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी, ४०० मी. धावणे; तर दुसऱ्या दिवशी ११० मी. अडथळा शर्यत, थाळीफेक, बांबू-उडी, भालाफेक आणि १,५०० मी. धावणे या क्रमानेच खेळांमध्ये भाग घ्यावा लागतो. खेळाडूच्या अष्टपैलू क्रीडानैपुण्याचा वेग, ताकद व दम यांची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडाप्रकारांमध्ये मिळून सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू विजयी ठरतो.
१९१२ मध्ये स्टॉकहोमच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये या प्रकाराचा प्रथम समावेश करण्यात आला आणि अमेरिकेचा जिम थॉर्प हा खेळाडू पहिला विजेता ठरला.
स्त्री-खेळाडूंसाठी असलेल्या सप्तशर्यती गटात एकूण सात क्रीडाप्रकार लागोपाठ दोन दिवसांत करावे लागतात. त्यांत पहिल्या दिवशी १०० मी. अडथळा-शर्यत, उंच उडी, गोळाफेक, २०० मी. धावणे व दुसऱ्या दिवशी लांब उडी, भालाफेक व ८०० मी. धावणे हे प्रकार करावे लागतात.
पंचशर्यती गटामध्ये एक दिवसात पुरुष खेळाडूंसाठी लांब उडी, भालाफेक, २०० मी. धावणे, थाळीफेक व अखेरीस १,५०० मी. धावणे हे प्रकार करावयाचे असतात. स्त्री-खेळाडूंसाठी ८० मी. अडथळा-शर्यत, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी व २०० मी. धावण्याची स्पर्धा अशा पाच क्रीडाप्रकारांची गटस्पर्धा १९६४ च्या टोकिओ ऑलिंपिकमध्ये घेण्यात आली. १९८१ पासून स्त्रियांसाठी पंचशर्यती गटाऐवजी सप्तशर्यती गटस्पर्धा घेण्यास सुरुवात झाली. पंचशर्यती गटप्रकार आता कालबाह्य ठरला असून आंतरराष्ट्रीय स्पर्धांत फारसा खेळला जात नाही.

स्त्रियांचे व्यायामी व मैदानी खेळ

स्त्रियांच्या मैदानी क्रीडास्पर्धा व्हासार येथे १८९५ मध्ये सुरू झाल्या. फ्रान्समध्ये १९१७ साली ‘फेडरेशन स्पोर्टिव्ह फेमिनाइन इंटरनॅशनल’ (एफ. एस. एफ. आय.) ही आंतरराष्ट्रीय क्रीडासंघटना स्थापन झाली आणि तिने १९२२, १९२६, १९३० व १९३४ या वर्षांत स्त्रियांच्या जागतिक क्रीडास्पर्धा भरवल्या. १९२८ साली ऍमस्टरडॅम येथील ऑलिंपिक स्पर्धांत स्त्रिया प्रथम सामील झाल्या. १९५२ च्या ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यासाठी ४१ देशांनी स्त्री-खेळाडूंचे संघ पाठवले होते.

काही जागतिक विक्रम व खेळाडू

व्यायामी व मैदानी खेळांच्या अर्वाचीन इतिहासात प्रत्येक क्रीडाप्रकारात जागतिक विक्रम आजवर नोंदले गेले आहेत. १९२० च्या दशकात फिनलंडच्या पाव्हो नूर्मी या धावपटूने दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत अनेक जागतिक उच्चांक प्रस्थापित करून, व्यायामी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता प्राप्त करून दिली. त्याने एकूण ३५ वेळा जागतिक उच्चांक मोडले आणि ऑलिंपिक स्पर्धांत ९ सुवर्णपदके व ३ रौप्यपदके जिंकली.
अमेरिकेच्या बेब डिड्रिकसनने स्त्रियांच्या मैदानी स्पर्धांना लोकप्रियता मिळवून दिली. तिने १९३२ च्या ऑलिंपिकमध्ये दोन सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले. १९३६ च्या ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या जेसी ओवेन्सने चार सुवर्णपदके जिंकली आणि एकूण सात क्रीडाप्रकारांमध्ये जागतिक उच्चांक प्रस्थापित केले. १९४० च्या दशकाच्या प्रारंभी अमेरिकेच्या कॉर्नेलिअस ‘डच’ वॉर्मरडॅम याने १५ फुटांपेक्षा उंच बांबू-उडी एकूण ४३ वेळा मारून लक्षवेधक कामगिरी बजावली.
१९५० च्या दशकातील महान खेळाडूंमध्ये चेकोस्लोव्हाकियाचा एमिल झाटोपेक हा दीर्घ पल्ल्याचे अंतर धावणारा धावपटू (ऑलिंपिक ४ सुवर्णपदके, १० वेळा जागतिक उच्चांक), पॅरी ओ‘ब्राएन हा गोळाफेकपटू (१३ वेळा उच्चांक), अल ओएर्टर हा अमेरिकन थाळीफेकपटू (४ वेळा ऑलिंपिक जेतेपद) यांचे उल्लेख आवर्जून करावे लागतील. १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टर हा ब्रिटिश धावपटू चार मिनिटांपेक्षा कमी वेळात एक मैलाचे अंतर पार करणारा पहिला खेळाडू ठरला.
पुढील वीस वर्षांत हा विक्रम करणारे २०० पेक्षा जास्त खेळाडू निघाले. मैदानी क्रीडाप्रकारांच्या ह्या उत्तरोत्तर घडत गेलेल्या विकासाची कारणे खेळाडूंमधील वाढती स्पर्धा, क्रीडातंत्रातील लक्षणीय प्रगती, प्रशिक्षणाच्या प्रगत सोयीसुविधा, अत्याधुनिक क्रीडासाधने आदी घटकांमध्ये आढळून येतील. १९८० च्या दशकातील विश्वविख्यात खेळाडूंमध्ये अमेरिकेचे अडथळा-शर्यतपटू एड्विन मोझेस, जलदधावपटू (स्प्रिंटर) कार्ल लूइस व धावपटू (४०० मी.) मायकेल जॉन्सन; दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीतील निष्णात धावपटू मोरोक्कोचे सैद औईता व ग्रेट ब्रिटनचे सेबास्तियन को; रशियाचा बांबू-उडीपटू सर्गेई बुब्का व ग्रेट ब्रिटनचा दशशर्यती-क्रीडापटू डॅली टॉम्सन आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
शियन सर्गेई बुब्काने बांबू-उडी प्रकारात एकूण ३५ विश्वविक्रम करून या खेळात नवा इतिहास घडवला. त्यांपैकी १८ विक्रम अंतर्गेही वा बंदिस्त (इनडोअर) क्रीडागारात, तर १७ खुल्या मैदानी स्पर्धांमध्ये होते. बंदिस्त क्रीडागारात त्याने ६·१५ मी. (२०’-२’’) तर मैदानी स्पर्धांमध्ये ६·१४ मी. (२०’ पावणेदोन इंच) अंतर पार करून विश्वविक्रम नोंदवले. जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये त्याने सहा वेळा जेतेपद मिळवून अभूतपूर्व विक्रम केला.
स्त्री-खेळाडूंमध्ये जलदधावपटू मारिटा कोच आणि जर्मनीची जलदधाव व लांबउडीपटू हाइक ड्रेखस्लर यांची १९८० च्या दशकातील कामगिरी लक्षणीय आहे. अमेरिकन जलदधावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर व सप्तशर्यतीपटू जॅकी जॉयनर-केरसी ह्याही उल्लेखनीय स्त्री-खेळाडू होत.
भारतीय खेळाडू : व्यायामी व मैदानी खेळांच्या विविध प्रकारांत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक भारतीय खेळाडूंनी आजवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांपैकी काही खेळाडूंचा निर्देश क्रीडाप्रकारांनुसार खाली देत आहोत.

धावणे

लघु:-अंतराच्या (१०० मी./२०० मी./४०० मी. ) शर्यती-नॉर्मन जी. प्रिचर्ड, मिल्खसिंग, आनंद नटराजन, राजीव बालकृष्णन, अनिल कुमार, परमजित सिंग; मध्यम अंतराच्या (८०० मी. / ५,००० मी. / १०,००० मी.) - श्रीरामसिंग, चार्ल्स बोरोमिओ, बहादूर प्रसाद, हरिचंद इ.; स्त्री खेळाडू-राधा, कमलजित संधू, पी. टी. उषा, शायनी विल्सन, मॉली चाक्को, ज्योतिर्मयी सिकदर व सुनिताराणी.
मॅराथॉन शर्यत: शिवनाथसिंग,हर्नेकसिंग;स्त्री खेळाडू- सत्यभामा.
अडथळा-शर्यत : (११० मी.) गुरुबचनसिंग, (४०० मी.) अमृतपाल, साहिबसिंग; स्त्री-खेळाडू-मंजित वालिया, एम. डी. वळसम्मा, अनुराधा बिस्वाल देवी बोस.
टप्प्यांच्या शर्यती : (रिले). (४ X १०० मी.) ए. नटराजन, आनंद शेट्टी, अर्जुन देवैय्य व पी. बैजू या चौघांचा संघ; स्त्री-खेळाडू-पी. टी. उषा, ई. श्यला, के. सरम्मा, रचिता पंडा या चौघींचा संघ. ( ४ X ४०० मी.)- मुरलीधरन, पी. व्ही. राजू. अय्यप्पन दुराई, अर्जुन देवैय्य या चौघांचा संघ; स्त्री-खेळाडू-वंदना राव, वंदना शानबाग, शायनी विल्सन, पी. टी. उषा या चौघींचा संघ.
चालणे : (२० किमी.) चांदराम, चरणसिंग राठी, मुंगलमसिंग; (५० किमी.)- किशनसिंग; स्त्री-खेळाडू-(१० किमी.) कविता गरार्रा.
शिखरलक्ष्यी : (३,००० मी.)- गुरमेजसिंग, दुर्गादास, गोपाल सैनी.
लांब उडी : टी. सी. योहानन; स्त्री-खेळाडू-ख्रिश्चन फॉरेज, लेखा टॉमस, जी. जी. प्रमिला, अंजू बॉबी जॉर्ज.
उंच उडी : भीमसिंग, चंदरपाल; स्त्री-खेळाडू-एंजल मेरी, बॉबी अलॉयसिअस.
तिहेरी उडी : हेन्री रिबेलो, मोहिंदरसिंग गिल; स्त्री-खेळाडू-लेखा टॉमस, अंजू माल्कोसे.
बांबू-उडी : लखबीर सिंग, संजीव पुत्तूर, विजयपाल सिंग.
गोळाफेक : बहादूर सिंग, जगराज सिंग, शक्ति सिंग; स्त्री-खेळाडू-हरबन्स कौर.
थाळीफेक : प्रवीणकुमार, शक्ति सिंग; स्त्री-खेळाडू-अनसूयाबाई, नीलम जे. सिंग.
हातोडाफेक : प्रवीणकुमार, प्रमोद तिवारी, इश्तियाक अहमद; स्त्री-खेळाडू-सुरिंदरजित कौर, जबेश्वरी देवी.
भालाफेक : जुजाद्दर सिंग, दलजीत सिंग, सतविर सिंग; स्त्री-खेळाडू-एलिझाबेध डेव्हनपोर्ट, गुरमीत कौर.
दशशर्यती गट : विजयसिंग चौहान.
सप्तशर्यती गट : स्त्री-खेळाडू-बी. एम. सुमवथी, जी. जी. प्रमिला.

1/Post a Comment/Comments

 1. मला थालीफेक विषयी संपूर्ण माहिती पाहिजे गुण पत्रका सह

  ReplyDelete

Post a Comment